गोव्यातील बालपणीची सवंगडी मांडवी असो, गेल्या महिन्यात नृसिंहवाडीला भेटलेली अवखळ कृष्णा असो किंवा ही समोरची नर्मदा... मला नद्या प्रचंड आवडतात.
नर्मदेचे दहा वर्षांपूर्वी जबलपूरला दर्शन झाले होते पण तिचे हे रूप धीरगंभीर वाटले. त्याला कारणही तसेच होते - काठावर चिरविश्रांती घेत असलेली नर्मदेची लाडकी लेक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
महेश्वर.
सकाळीच पावसाची सर येऊन गेली होती आणि मी व Arti थोडं लवकरच पोचलो होतो. पर्यटकांची गर्दी नव्हती. राजराजेश्वर मंदिर, सहस्रार्जून मंदिर असं दर्शन घेत घाटाच्या पायऱ्या उतरून नदीतीरावर बसलो.
अहिल्यादेवींबद्दल इतिहास, कथा, कादंबऱ्या वाचल्या आहेत. महाराष्ट्रातील शिंदे पाटलांच्या चुणचुणीत मुलीला सुभेदार मल्हारबा होळकरांनी आपल्या मुलासाठी पसंत केली. पण नंतर एकामागून एक दुर्दैवाचे आघात झाले. करारी सासरा, प्रेमळ व कर्तव्यदक्ष सासू गौतमीबाई, रणांगणावर वीरगती प्राप्त झालेला नवरा, बदफैली व अल्पायुषी मुलगा, कर्तबगार जावई, सती गेलेली लाडकी लेक मुक्ता... मृत्यूसत्र पाहून कोणतीही व्यक्ती कोलमडून गेली असती, पण बाई सावरल्या.
हा सगळा इतिहास 'इतिहास' म्हणून माहीत होता. पण इथे रेवातीरी बसून हे सगळं आठवलं आणि डोळे भरून आले. आपण एवढ्या-तेवढया गोष्टींवरून त्रागा करतो, घरच्यांनाच नाही तर प्रत्यक्ष परमेश्वराला बोल लावतो. पण इथे जीवाभावाची सर्व माणसें गमावलेली ही बाई उभी राहते, संपूर्ण जहागीरीचे दानपत्र लिहून शंभूमहादेवाला अर्पण करते व 'इदं न मम' या भावनेने तब्बल ३० वर्षें राज्यकारभार चालवते. केवळ स्वतःचे राज्य सांभाळत नाही तर देशभरात ३४ ठिकाणच्या प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करते, तोही खासगीच्या पैशांतून, रयतेला तोशीस न लावता.
महेश्वरच्या वाड्याच्या प्रांगणात अहिल्यादेवींचा एक पूर्णाकृती पुतळा आहे. त्यातील डोळ्यांतले भाव इतके प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आहेत की खरोखरच एक आई उभी असावी असे वाटते.
इंदोरला गेलात तर महेश्वरी जा.
पण गृप करून नको, जास्तीत जास्त दोघे जा.
नर्मदामातेच्या प्रेमात डुबकी मारून या.
आणि या देवीमातेच्या कुशीत स्वस्थचित्त होऊन बसा.
वाटलं तर मनच्या दोन गोष्टी सांगा.
निघावंसं वाटणार नाही....
... पण शांत, रीतं होऊन मानवी कोलाहलात परत या,
निरुपाय म्हणून.
No comments:
Post a Comment