Tuesday, June 18, 2024

Music pun

 जसं एखादी डिश फार आवडते म्हणून आपण ती कुठल्याही वेळी खात नाही, तसंच काहीसं गाण्यांबद्दलही आहे. भल्या पहाटे रामप्रहरी एफएम रेडिओवर एखादा अर्जित स्वतःच्या आतड्यांना गाठ पडलेल्या स्वरात इश्क, मुहब्बत वगैरे आळवू लागतो तेव्हा मलाच मळमळायला होतं. 

माझ्यापुरतं बोलायचं तर सकाळ व्हावी ती संतवाणीने. पं भीमसेन जोशींच्या दणदणीत, बुलंद स्वरांत आरंभी वंदावे अयोध्येच्या राजाला, आणि मग ज्ञानियांचा राजा आठवावा. सूर्यनमस्कारादी व्यायाम करताना एखादी वेस्टर्न क्लासिकलमधली सिंफनी चालू करून द्यावी. ती चांगली तास-दीडतास चालते व आपले काही स्क्वॉट्स जास्तीचे होतात.

 स्नान करून Challekere बंधूद्वयांच्या सोबतीने एखाद्या सुक्ताचा पाठ करावा. सुक्ते, स्तोत्रे यांना एक अंगभूत लय असते व ती तशीच चांगली वाटतात. नेहमीच्या गायक गायिका गातात ते अनेकदा ऐकवत नाही. Challekere Official यूट्यूब चॅनल सपडल्यापासून कानांवरचे हे अत्याचार कमी झालेत. 

ऑफिसची कामं करताना हेडफोन्सवर गाणी ऐकणं मला जमतच नाही. फक्त कधी रात्री उशिरापर्यंत काम राहिलेच तर instrument-based tunes (बासरी, व्हायोलिन, सतार, इत्यादी) अथवा आता अनेक चांगल्या गाण्यांचे instrumental version येते ते ऐकतो. 

जॉगिंग/रनिंग करताना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत बेस्ट. विशेषतः संध्याकाळी कातरवेळी राग मारवा अथवा श्री राग एक वेगळाच introspective माहौल तयार करतो. सध्या Audible चं भूत स्वार असल्याने त्यावर पुस्तकं ऐकणं होतंय.

प्रवासात उडत्या चालीची, ठेका असलेली गाणी - जुनी व नवीन - प्लेलिस्टमध्ये असतात, आणि मराठी भावगीतं.

अर्थात नेहमी हे सगळं काटेकोरपणे अगदी असंच होतं असं नाही, आणि इतरांनी याप्रकारे regimentation करावं अशी अपेक्षा तर अजिबातच नाहीये. मी माझा स्वाभाविक कल सांगितला.

इंग्रजी गाणी आवडतात, पण आमची गाडी कधी Bryan Adams, Backstreet Boys, Shakira, Britney Spears यांच्यापुढे फारशी सरकलीच नाहीं. त्यातही ब्रिटनीच्या गाण्यांपेक्षा खुद्द ब्रिटनीच जास्त आवडायची. 

नवीन इंग्रजी गाणी तर माहीतच नव्हती, पण ती कसर आता पोरगी भरून काढत आहे. अनेक चित्रविचित्र नावांची मंडळी ती फोनमध्ये घुसवत असते. एकदा मी धीर एकवटून तिला विचारलं की 'हे Billie Ellish प्रकरण "तो "आहे की "ती"?"

त्यावर तिने एक जळजळीत कटाक्ष टाकला (आईचं पाहून शिकतेय) आणि "तुला काय करायचंय? तू गाणं लाव आधी तिचं" असं म्हणून मला वाटेला लावलं. 

तरी अजून -

"या बाईचं गाणं ऐकून लोकं 'ए खुदा, त्यापेक्षा आम्हाला बहीरं कर' अशी दुआ मांगतात म्हणून तिचं नाव Dua Lipa आहे"

"टेलर स्विफ्ट इतके तोकडे कपडे घालते की तिच्या टेलरचं काम अगदी स्विफ्टली होत असणार"

"ज्या लाकूडतोड्याची कुऱ्हाड तळ्यात पडून त्याला तीन कुऱ्हाडी भेटल्या, त्याचा नातू म्हणजे Justin "Timberlake"

... 

अश्या अजून बऱ्याच कोट्या मला तिच्यापासून सुरक्षित अंतरावर उभं राहून शेअर करायच्यात.

No comments: